टीम AM : पुण्यातील कॉलेजमध्ये शिकण्यासाठी सोलापुरातून दुचाकीवरून निघालेल्या तीन मित्रांवर टेंभुर्णीजवळ काळाने घाला घातला. बुधवारी मध्यरात्री सोलापूर – पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ अरण गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला.
तेजस सुरेश इंडी (वय 20), लिंगराज शिवानंद हाळके (वय 24), गणेश शरणप्पा शेरी (वय 22) तिघेही रा. धोंगडेवस्ती, भवानी पेठ, सोलापूर अशी अपघातात ठार झालेल्या मित्रांची नावे आहेत.
तेजस इंडी हा पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो ट्रेनने जाणार होता. मात्र, लिंगराज हाळके आणि गणेश शेरी यांनी दुचाकीकरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी रात्री तिघे दुचाकीवरून पुण्याला निघाले. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ अरण गावच्या हद्दीत करकडे नाका येथे त्यांच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली.
या अपघातात तेजस इंडी आणि लिंगराज हाळके या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश शेरी हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर पेट्रोलिंग महामार्ग पोलिसांनी अपघातातील वाहन बाजूला करून तिघांना तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेजस इंडी आणि लिंगराज हाळके या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तिसरा मित्र गणेश शेरी यास जखमी अवस्थेत शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी किरण सुभाष इंडी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.