टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी मागे घेतला आहे. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या सर्वांची मागणी लक्षात घेत, त्यांच्या मताचा आदर राखत निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.
‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मवृत्ताच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता, या निर्णयाला पक्षातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसंच नेत्यांनी विरोध केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य समितीने आज सकाळी एक बैठक घेऊन, पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय फेटाळून लावला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत असा ठराव आम्ही आज पारित केल्याचं पटेल यांनी सांगितलं होतं.