‘त्रिशूल’ चित्रपटाला झाली 46 वर्षे पूर्ण : आजही गाणी आहेत लोकप्रिय

टीम AM : त्रिमूर्ती फिल्म्स व गुलशन रॉय निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित मल्टी स्टारकास्ट चित्रपट ‘त्रिशूल’ 5 मे 1978 रोजी मुंबईत अप्सरा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याला आज 46 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाची पटकथा व संवाद सलिम जावेद यांनी लिहिले होते. 

सलिम जावेद यांची पटकथा आणि टोकदार संवाद हे वैशिष्ट्य ठरले. या चित्रपटात संजीवकुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन, सचिन पिळगावकर, वहिदा रहेमान, हेमा मालिनी आणि राखी यांच्यासह पूनम धिल्लनने अभिनय केला होता. पूनम धिल्लनचा हा पहिला चित्रपट होता. 

सचिन व पूनम यांच्यावरील लता मंगेशकर आणि नीतिन मुकेश यांनी गायलेले ‘गापूची गापूची गम गम’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. लता मंगेशकर आणि किशोरकुमार यांनी गायलेले ‘जानेमन तू कमाल करती हो’ तसेच लता मंगेशकर आणि किशोरकुमार व नितीन मुकेश यांचे ‘मोहब्बत बडे काम की चीज है’ या गाण्यानीही चांगली लोकप्रियता संपादली. 

साहिर लुधियानवी यांच्या गीतांना खय्याम यांनी संगीत दिले होते. चित्रपटाचे छायाचित्रण केजी यांनी केले आहे. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाचे समिक्षकांनी विशेष कौतुक केले. या चित्रपटाचा मुहूर्त राजकमल कलामंदिर स्टुडिओत झाला होता.

शब्दांकन : संजीव वेलणकर