राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा

टीम AM : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत आहे. त्यातच आता हवामान खात्याने मराठवाड्यासह विदर्भात पुढील दोन ते तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं बळीराजा संकटात सापडण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत बीड, पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ठिकाणी साठवणूक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाडा तसेच विदर्भाला पावसाने झोडपून काढलं आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. ऐन उन्हाळ्यात सातत्याने अवकाळी पाऊस होत असल्यामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं आता बळीराजाला आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.