शोकाकुल वातावरणात सुनिल (काका) लोमटे यांच्यावर अंत्यसंस्कार

टीम AM : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल (काका) बालासाहेब लोमटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि. 5) दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 48 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी (दि. 6) रविवार पेठेतील बोरुळ तलाव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनिल लोमटे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने अग्रेसर होते. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक चळवळ गतिमान केली होती. सामान्य माणसांच्या सुख दुःखात ते समरस होत असत. गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणारे, त्यांच्या अडचणींमध्ये धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. शहरातील अनेक वस्त्यातील सामान्य लोक ते व्यावसायिक, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक यांना सुनिल लोमटे यांचा मोठा आधार होता. तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेझ होती.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुनिल लोमटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली. स्व. मुंडे यांच्या नंतर तत्कालीन मंत्री पंकजा आणि खा. प्रीतम मुंडे यांना खंबीर साथ देत सुनिल लोमटे यांनी पक्ष वाढविण्याचे कार्य केले. 

शुक्रवारी दुपारपर्यंत कामे आटोपून घरी येत ते नेहमीप्रमाणे झोपले होते. याच दरम्यान त्यांना झोपतेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच हजारो नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी रविवार पेठेतील बोरुळ तलाव स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनिल लोमटे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी त्यांच्या घरी पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. 

अंत्यसंंस्काराच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, रमेश आडसकर, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गिरधारीलाल भराडिया, युवा नेते अक्षय मुंदडा, मुजीब काझी, पत्रकार दत्ता आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारासाठी बीड जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित होते.