आपण मुलांना शाळेत का पाठवतो याचा विचार केला, तर 10 टक्के पालकांनाही हे खात्रीने सांगता येणार नाही. 90 टक्के मुले पालकांनी पाठवले म्हणून शाळेत येतात. शिक्षणातून आनंद तर मिळालाच पाहिजे; पण त्याहीपेक्षा ते भीतीमुक्त करणारे असावे. वर्षाच्या शेवटी परीक्षेचा ताण, दबाव नसेल, तेव्हाच मुले शिक्षणाचा आनंद घेऊ शकतील. हल्ली मुलांना परीक्षेतील गुणांची भीती घातली जाते. त्यामुळे कमी गुण मिळाले, तर मुलांमध्ये नैराश्य येते. गुणांपेक्षाही तुम्ही आयुष्यात काय करता याला खूप महत्त्व आहे. गुण हे केवळ पुस्तकी माहितीवर मिळतात. ते तुमची योग्यता ठरवत नाहीत. आपण मुलांना जगण्याची क्षमता देऊ शकलो, तर आपण मुलांना चांगले शिक्षण दिले, असे मी मानतो.
ज्या गोष्टी शिकताना आपल्याला आनंद मिळतो, तेच शिक्षण, ही शिक्षणाची सोपी व्याख्या आहे. शिक्षण घेताना मुलांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. अनेकदा पालक आपल्या इच्छा मुलांवर लादतात. आपण नाही केले, म्हणून मुलांनी ते करावे अशी त्यांची अपेक्षा असते. याच नादात ते मुलांचे करिअरही ठरवतात. मुलांना आपल्या अपेक्षापूर्तीचे साधन समजू नये. मुलांचे आयुष्य स्वतंत्र आहे, याचे भान पालकांनी बाळगले पाहिजे.
शाळा असो किंवा कुठलाही क्लास, पालक आपल्या मुलांची, त्यांच्या गुणांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करतात. हल्ली सर्रास हे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. तुलना करून आपण त्यांच्या शिक्षणाचे नुकसान करत असतो हे पालकांच्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा पालक शाळेला दोष देतात, शाळा पालकांना दोष देते, विद्यार्थी शिक्षकांना दोष देतात; पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे तीन घटक एकत्र आले, तरच शाळा बनते. शाळा ही केवळ शिक्षक, केवळ पालक किंवा केवळ विद्यार्थ्यांचीच नाही. म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या तिन्ही घटकांचे एकत्रित योगदान लागते.
शाळेमुळे मुलांची समाजाशी ओळख होते. आपल्या सोबत असणाऱ्यांशी कसे वागावे, कसे बोलावे याचे ज्ञान ती इथे घेत असतात. मुलांनी शाळेत फक्त भूगोल, इतिहास शिकायला यायचे नाही, हे पालकांनाही समजण्याची गरज आहे. मुलांचे केवळ गुणपत्रक बघत असाल, तर तुमचे कुठेतरी चुकत आहे. मुलांच्या भावना विकसित झाल्या नाहीत, तर त्यांच्या गुणपत्रकावर कितीही गुण असले तरी ती माणूस म्हणून शून्य होतील, हे पालकांनी समजून घ्यावे. अन्यथा मुले शिक्षित होतील पण सुशिक्षित होणार नाहीत.
जगदीश काबरे (जेष्ठ विचारवंत)