‘आर्ची’ या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती

टीम AM : मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटली आहेत. मात्र आजही प्रेक्षक ते चित्रपटात तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने पाहातात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘सैराट’. 2016 साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते.

या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सात वर्षे झाली आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाविषयी काही खास गोष्टी…

‘सैराट’ या चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘सैराट’ मुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचे शिखर गाठले. तिने साकारलेले आर्ची हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या भूमिकेसाठी आधी दुसऱ्या एका मुलीची निवड झाली होती.

अभिनेत्री सायली पाटीलची आर्ची या भूमिकेसाठी निवड झाली होती. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. सायली म्हणाली, ‘मी पुण्यात आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होते आणि कॉलेजमध्ये ऑडिशन सुरू होत्या. मी सहज ऑडिशन दिली. मला कळतही नव्हतं काय चाललंय. पास झाले. पण मला गांभीर्य नव्हतं मी काय करतेय. नागराज सरांनी ठरवलं मीच आर्ची होणार पण तेव्हा मी नाही म्हणाले.

‘सैराट’ आला प्रचंड यश मिळालं पण मी अभिनय करायचं ठरवलं नव्हतं त्यामुळे मला तेव्हा असं मुळीच वाटलं नाही की मी करायला हवा होता रोल वगेरे. त्यानंतर काही वर्षांनी नागराज सरांचा फोन आला. मला तो प्रॅन्क कॉल वाटलेला. ते म्हणाले, मी नागराज बोलतोय. मला असं झालं की, कोण नागराज मंजुळे मी नाही ओळखत. मग मी ऐश्वर्या राय बोलतेय. एवढा मोठा माणूस आपल्याला का लक्षात ठेवेल असं वाटलं.

‘झुंड’ माझ्यासाठी एक धक्काच होता. मी सेटवर गेले तर मला समजलं की अमिताभ बच्चन सर असणार आहेत चित्रपटात. मग मला वाटलं की इथे कुठेतरी कॅमेरा लावला असणार. हे खोटं आहे सगळं.’

पुढे सायली म्हणाली, ‘मला या गोष्टीचं छान वाटलं की ‘सैराट’ हा आर्ची आणि परशासाठी होता, त्यांनी तो गाजवला. पण माझ्यासाठी लक्ष्मी लिहिलं गेलं होतं, माझ्यासाठी भावना लिहिलं गेलं होतं आणि ते बॅक टू बॅक आलं. मोठ्या ब्रॅण्डसोबत काम केलं. त्यात आणखी चांगली गोष्ट घडली की माझं शिक्षण पूर्ण केलं. तेच जर आर्ची घडली असती तर ते झालं नसतं.’