अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर धनंजय मुंडेंचा झेंडा : कार्यकर्त्यांचा जल्लोष

टीम AM : बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण – भावामुळे प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. दरम्यान, आज हाती आलेल्या बाजार समितीच्या निकालात जिल्ह्यात 6 पैैैकी 5 बाजार समित्यांवर महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असून, भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. बाजार समितीच्या निकालात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविलेल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत तर भाजप प्रणीत गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल घोषित होताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि शहरातील मुख्य रस्त्यावरून विजय मिरवणूक काढली. या विजयी मिरवणूकीत माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गोविंद देशमुख सहभागी झाले होते.