टीम AM : दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक गेल्या वर्षापासून बराच चर्चेत आला आहे. आधी चंद्रमुखी आणि नंतर धर्मवीर या दोन चित्रपटांनी त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. सिनेकारकिर्दित आयुष्याला कलाटणी देणारे हे दोन चित्रपट ठरले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सध्या प्रसादचे दोन चित्रपट देखील बरेच चर्चेत ठरले आहेत, डॉ. प्रभाकर पणाशीकर यांच्या बायोपिक मध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे तर निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे तो स्वतः दिग्दर्शन करणार आहे. अशातच त्याने आणखी एका मोठ्या चित्रपटाची घोषणा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असे म्हणतात. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील राहत्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशाला मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित ‘परिनिर्वाण’ चित्रपट येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
यावेळी अभिनेता प्रसाद ओक देखील उपस्थित होता. तो कोणती भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्कंठा होती आणि अखेर ते जाहीर झाले आहे. चित्रपटात प्रसाद ओक ‘नामदेव व्हटकर’ यांची भूमिका साकारणार आहे.
यावेळी त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नामदेव व्हटकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. प्रचित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला हा एकमेव अवलिया आहे, ज्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण आहे. कारण बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लोटलेला जनसागर या एकमेव अवलियाने कॅमेऱ्यात कैद केला आहे.
6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे निधन झाले. महामानवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लाखो जनता रस्त्यावर उतरली होती. देशाचा श्वास रोखून धरणारा हा क्षण नामदेव व्हटकर यांनी चित्रित केला. जवळपास 3000 फुटांची रिळ व्हटकर यांनी तयार केली. त्यांच्यामुळेच आज आपण परिनिर्वाणाची दृश्य पाहू शकतो.
ते स्वतः उत्तम कॅमेरामॅन होते, ते दिग्दर्शक होते, निर्माते होते. त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात काही चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसे ते राजकीय विश्वातही बरेच सक्रिय होते. ते आमदारही झाले आहेत. त्यांचा जीवनप्रवास या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका प्रसाद करणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.