रेती, वाळू धोरणाची 1 मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

टीम AM : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती / वाळू मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.

महसूल मंत्री विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल कार्यालयातील उपायुक्त, विभागीय आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्ती नष्ट करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे; असे सांगून विखे- पाटील म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती, वाळू धोरणानुसार रेतीचे-वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती / वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून या धोरणाची अंमलबजावणी करताना काय अडचणी येत आहेत याबाबतचा अभ्यास करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.