टीम AM : बॉलिवूडमध्ये 70 ते 80 च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे मौसमी चॅटर्जी. त्यावेळी त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या.
मात्र, त्यांचे नाव कधीच कोणत्या अभिनेत्यासोबत जोडले गेले नाही. आज 26 एप्रिल रोजी मौसमी चॅटर्जी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…
मौसमी यांनी ‘घर एक मंदिर’, ‘मंझिल’, ‘अनुराग’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘प्यासा सावन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म 26 एप्रिल 1948 साली कोलकाता येथे झाला. मौसमी यांचे खरे नाव इंदिरा चट्टोपाध्याय असे आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांचे नाव बदलून ‘मौसमी’ असे ठेवण्यात आले.
16 व्या वर्षी झालं लग्न
मौसमी यांना त्याचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. परंतु त्यांच्या नशिबात काही वेगळंच होतं. मौसमी यांचे अगदी जवळचे नातेवाईक मृत्यूशय्येवर होते, त्यामुळे त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार मौसमी याचं लग्न लावण्यात आलं. त्याचं लग्न हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जी यांच्याशी झालं. लग्नानंतर मौसमी आणि जयंत यांना पायल व मेघा या मुली झाल्या. लग्नानंतर मौसमी यांनी सिनेमात काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाला नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा होता.
ग्लिसरीनशिवाय करायच्या सीन
मौसमी चॅटर्जी यांच्या अभिनयाबाबत सांगितलं जायचं की त्या कोणताही भावुक प्रसंगात रडण्याचा सीन त्या ग्लिसरीनशिवाय करायच्या. मौसमी एखादी भूमिका साकारताना त्यात शिरायच्या. त्यामुळे ती भूमिका जिवंत व्हायची. त्यामुळेच त्यांच्या कामाचं प्रेक्षकही भरभरून कौतुक करायचे.
मुलीच्या मृत्यूचं सोसलं दु:ख
मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल हिला डायबेटीस होता. तिच्या मृत्यूच्या आधी ती कोमात होती. अखेर 2019 मध्ये पायलनं या जगाचा निरोप घेतला. आपल्या मुलीच्या निधनाचं दुःख मौसमी यांना भोगावं लागलं. मुलीच्या निधनाचं दुःख त्यांना सहन करता आलं नाही.
मुलीच्या मृत्यूनंतर मौसमी यांनी जावयावर अनेक गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर त्याच्याविरोधात खटला देखील दाखल केला. या सर्वप्रकरणी मौसमी चॅटर्जी वादामध्ये अडकली होती. सध्या मौसमी मुंबईतील त्यांच्या घरी आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करत आहेत.