टीम AM : मागील काही दिवसात कारण नसताना वृत्तपत्र, टीव्हीवर माझ्याबाबतच्या अनेक बातम्या, अफवा, वावड्या सुरु आहेत. कारण नसताना माझ्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
परंतु कार्यकर्त्यांनी या अफवांना बळी पडू नये. मी एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ति आहे. मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. बारामतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, गेली काही दिवस सारखी माझीच चर्चा चालू आहे. त्यांना अजित पवार एवढा का आवडला समजत नाही. मी नाॅट रिचेबल असलो की दिल्ली, मुंबईपासूनचे पत्रकार मागे लागतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम असतात. त्यामुळे कधी काही कार्यक्रमांना हजर राहता येत नाही. तिथे नाही गेलो तर अजित पवार का आले नाहीत, कार्यक्रमाला गेलो तर इथेच का आले, अशा अनेक शंका नाहक निर्माण करत आहेत.
आता मी माझ्या शरीराचा अर्धा भाग इकडे आणि अर्धा तिकडे पाठवू का ? असा सवाल त्यांनी केला. मी काही बोललो की त्याचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मी बोललो तर असेच का बोललो, बोललो नाही तर का ? असे नाहक प्रश्न निर्माण केले जात आहेत. काहींना वाटतेय मी सकाळी आठला पुन्हा जातोय की काय? पण मी अखेरपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे. पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल. मी त्याच्याशी सहमत असेल. लोकांचे भले करण्याचे काम मी करतोय. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून रात्री उशीरापर्यंत काम करतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या बातम्यांकडे लक्ष देवू नये. कामाकडे लक्ष देत तेथे योगदान द्या, असे आवाहन पवार यांनी केले.