शाळेत पहिले पाऊल : 15 लाख मुलांच्या तयारीसाठी राज्यभरात 65 हजारहून अधिक मेळावे

टीम AM : शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल – शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे.

या अंतर्गत राज्यातील 65 हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे 15 लाख मुलांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी वरळीच्या मनपा शाळेतून तर 27 तारखेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांदा जि.प.शाळेतून केसरकर या अभियानाचा शुभारंभ करतील.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, या अभियानात मातांचा सहभाग उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुलेंचा वारसा त्या खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. त्यांच्या सहकार्यानेच हे अभियान यशस्वी होत आहे. जागतिक स्तरावर हे सिद्ध झाले आहे की, वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा 80 टक्के विकास होतो. यासाठी बालशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. तसेच चांगली पिढी घडवायची असेल तर शिक्षणाबरोबरच मुलांचे संगोपन उत्तम होणेही गरजेचे आहे. या उद्देशाने 30 एप्रिल पर्यंत राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.