बुट्टेनाथ परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन : शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेळीचा जीव थोडक्यात बचावला  

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

टीम AM : शहरालगत असलेल्या बुट्टेनाथ परिसरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत आहे. मागील पंधरवड्यात बिबट्याने गाईवर हल्ला चढवला होता. त्यावेळेस काही जणांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, प्रत्यक्षदर्शीने त्या बातमीत तथ्य असल्याचे सांगितले होते. 

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पुन्हा बिबट्याने बुट्टेनाथ परीसरात दर्शन दिले. तेथील शेतकऱ्यांच्या शेळीवर हल्ला चढवला. मात्र, शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जबड्यात पकडलेली शेळी सोडून त्याने पलायन केले.  

जखमी शेळीला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी देखील बिबट्यानेच हल्ला केला असल्याची पुष्टी दिली. या सर्व घटनेमुळे बुट्टेनाथ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तात्काळ सदर परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.