राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतली रिक्त पदं येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत भरण्याच्या सूचना

टीम AM : राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतली रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिल्या असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. 

खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे खासदार इम्तियाज जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. 

खासदार इम्तियाज जलिल

केंद्र सरकार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार आहे, मात्र यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचं कोणतंही नियोजन केलेलं नाही, असं मत जलील यांनी न्यायालयासमोर मांडलं.

जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार जलील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याची माहितीही जलील यांनी यावेळी दिली.