राष्ट्रवादीला धक्का ; अखेर नमिता मुंदडा यांचा भाजपात प्रवेश

ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केज मतदार संघात उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. नमिता मुंदडा यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. राज्याच्या मंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळी येथे नमिता मुंदडा यांनी प्रवेश केला. यावेळी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्यासह मुंदडा समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.

केज मतदार संघात गेल्या चार पाच दिवसापासून नमिता मुंदडा यांच्या प्रवेशाची चर्चा होती. आज त्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. प्रवेश करण्याअगोदर आज सकाळीच नमिता मुंदडा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीची दिल्लीत बैठक झाली. यात राज्यातील उमेदवारांची यादी फायनल करण्यात आली आहे. या यादीत नमिता मुंदडा यांचे नाव असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. नमिता मुंदडा यांच्या प्रवेशामूळे सहाजिकच विदयमान आ. संगिता ठोंबरे यांची उमेदवारी संपुष्ठात आली आहे. केज मतदार संघात आता भाजपकडून नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारासोबतच तिरंगी लढत होईल असे चिन्ह दिसून येत आहे.