अंबाजोगाई : जमिनीच्या उदरातील पाणीसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी देशाला दुष्काळ आणि पुर या दोन्ही दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याला जबाबदार प्रत्येक नागरिक आहे. यासाठी शासनाने जल सुरक्षा कायदा आणण्याची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन जागतिक कीर्तीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.
बीड जिह्याचे माजी खासदार तथा जेष्ठ स्वांतत्र्यसेनानी कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या ११ व्या स्मृती व्याख्यानाचे आयोजन सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी मुकुंदराज सास्कृतिक सभागृह येथे करण्यात आले होते. याप्रसंगी राजेंद्रसिंह राणा प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब गाठाळ होते.
डॉ. राजेंद्रसिंह राणा बोलताना म्हणाले की, पाणी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून पाण्याच्या स्त्रोतांचे जतन आणि संवर्धन करणे हे सरकारसह प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. नद्या ह्या आपल्या जलवाहिन्या आहेत. त्यांच्याविषयीचा आदर मात्र आपण हरवून बसलो आहोत. शाश्वत पाणीसाठा धरतीच्या उदरात चिरकाळ टिकावा.आपणच आपल्याला पुरेशा जलसाठ्याची तरतूद केली पाहिजे अथवा येणाऱ्या दहा वर्षात शून्य जलसाठा होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. माणसाला ज्याप्रमाणे अन्न , पाणी , औषधाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे जमीनीला माती आणि पाण्याची आवश्यकता असते.
पुढे बोलताना राजेंद्रसिंह राणा म्हणाले की, मृत झालेल्या नदयावर नैसर्गिक पाणीदार पध्दतीने काम करून त्या पुन्हा जिंवत कराव्या लागतील. तसेच अधिकाधिक वृक्षारोपन करून आपल्या गावात आदर्श वातावरण तयार केल्यास आलेले ढग त्याच गांवात थांबविणे शक्य आहे. मराठवाडयांतील जनतेने वेळीच जनजागृती नाही केली तर मराठवाडयाचे वाळवंट होण्याची भिती आहे. कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीपासुन प्रेरणा घेऊन अंबाजोगाई पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राजेंद्रसिंह राणा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सभागृहातील पाच महिंलाना पाणी जागृतीची धुरा सोपवली.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात व्याख्यानमालेचा हेतु स्पष्ट करताना ॲड. अजय बुरांडे म्हणाले की, मराठवाडयात सातत्याने पर्जन्यमान कमी होत आहे. यावेळी सामुहिक कार्यपध्दतीने काम करून पाण्याचा प्रत्येक थेंब गावातच जिरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी राजेंद्रसिंह राणा यांचे मार्गदर्शन फार महत्त्वाचे ठरेल. कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे प्रतिष्ठाण समाजाला निकड असलेल्या प्रश्नाविषयी जनजागृतीचे काम करत आलेली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सविता बुरांडे तर आभार प्रदर्शन प्रशांत मस्के यांनी केले. या व्यााख्यानासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठया संख्येने उपस्थिती होती.