शिंदेशाहीचा बुलंद आवाज आनंद शिंदे : गाण्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली नोंद

टीम AM : प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा पुढे चालवणारे गायक आनंद शिंदे यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. 21 एप्रिल 1965 रोजी झाला. दमदार गायकी, ठसकेदार आवाजाने आनंद शिंदे यांचा एक वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला. 80 च्या दशकात धुमाकूळ घालणारे गाणे ‘जवा नवीन पोपट’ हा ऐकले की सर्वप्रथम डोळ्यापुढे चेहरा येतो आनंद शिंदे यांचा. 

आनंद शिंदे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. पण त्यांचे लहानपण मुंबईत गेले. कव्वालीचे मुकाबले हे त्यांच्या खास आवडीचे. वडील प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्रमाला आनंद जात असत. कोरसमध्ये गाणी गाणे त्यांच्या अगदी आवडीचे होते. आनंद शिंदे यांचा जन्म संगीतप्रेमी घरात झाला. आनंद शिंदे यांनी शाळेत असतानाच गाणे म्हणायला सुरुवात केली.

शाळेत अभ्यासापेक्षा गॅदरींगमध्ये गाणे गायला कधी मिळणार याकडे आनंद शिंदे यांचे लक्ष असे. नववीत नापास झाल्यानंतर आनंद यांनी हाती तबला घेतला. मार खात खात ते तबलावादन शिकले. जेव्हा कव्वालीचा मुकाबला असे तेव्हा आनंद आणि मिलिंद हे दोघे भाऊ ढोल वाजवायचे. वडिलांच्या गैरहजरीत तेच कार्यक्रम करत असत.

आनंद शिंदे यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी, पंजाबी, उर्दू, तामिळ आणि इतर अशा एकूण आठ भाषांमध्येही गायन केले आहे. ‘होऊ दे जरासा उशीर’ हे टायटल गाणे असलेल्या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले होते. आनंद शिंदे यांना जनमाणसात लोकप्रिय करणारे गाणे ठरले ‘जवा नवीन पोपट’. हे गाणे कसे बनले याची कथाही रंजक आहे. 

मुरबाड येथे एक कव्वालीचा कार्यक्रम होता. त्यात मानवेल गायकवाड हे शिंदे यांच्या पार्टीचे कवी होते. या कार्यक्रमादरम्यान समोरच्या पार्टीने पोपटाचे एक गाणे म्हटले आणि त्याला पोपटाच्या गाण्यानेच उत्तर द्यायचे होते. तेव्हा प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यावर गायकवाड यांनी पोपटाचे गाणे रचले आणि नवीन पोपटाचे गाणे तयार झाले. हे गाणे नंतर इतके प्रसिद्ध झाले की त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. या गाण्याने त्यावेळी कॅसेट विक्रीचे सर्वच उच्चांक मोडले. हे पाहून व्हिनस कंपनीने त्यांना एक गाडी भेट दिली. ती आजही त्यांनी प्रेमाने जपून ठेवली आहे. 

हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आनंद शिंदे यांना आहेत. आनंद शिंदे यांच्या तीन मुलांपैकी आदर्श शिंदे सध्या तरुणाईला आपल्या तालावर डोलायला लावत आहे. एकापेक्षा एक सुपरहिट गाणे सध्या आदर्शच्या नावावर आहेत. समाजाचे ऋण परतफेड करण्यासाठी त्यांनी उत्कर्ष या मुलाला डॉक्टर बनविले. पण तिघाही मुलांना गायनाची आवड आहे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्या नावावर त्यांनी ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट’ ची स्थापना केली आणि या माध्यमातून ते गरीब रुग्णांची मोफत सेवा करत आहेत.

शब्दांकन : संजीव वेलणकर