टीम AM : सिल्लोड – जळगाव रस्त्यावर टिपू सुलतान चौकात भरधाव वेगाने छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील दोघा भावांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता झाला. रुपेश ज्ञानेश्वर कळम (वय 8 वर्ष), रितेश ज्ञानेश्वर कळम (18 दोघे रा. भवन) अशी मृत भावांची नावे आहेत.
रुपेश आणि रितेश हे दोघे भाऊ भवन येथून सिल्लोड शहरात हॉटेलचे समान घेण्यासाठी मोटारसायकलवर (एमएच 20 एपी 6173) येत होते. तर लोडिंग ट्रक (एमएच 20 इजी 9495) हा जळगाव कडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. शहरातील टिपू सुलतान चौकात वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यावेळी ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार, फौजदार बी. व्ही. झिंझुरडे, एन. एस. घोडे आदी कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर चालक व क्लिनर ट्रक सोडून फरार झाले आहेत.