टीम AM : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिल रोजी गट – ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा एकूण 33 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या केंद्रावर जिल्ह्यातील 9 हजार 840 उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, 33 परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाइल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रिक वस्तू व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षेसाठी आवश्यक साहित्य उमेदवारांना जवळ बाळगण्यास अनुमती राहील, तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. उमेदवाराने त्यांच्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी साडेआठ पूर्वी उपस्थित राहावे.
परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी आदेशात नमूद केले आहे.