टीम AM : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची धमाल भूमिका असलेल्या ‘गोलमाल’ चित्रपटाला आज 45 वर्षे झाले. सत्तरच्या दशकातील शहरी महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय चित्रपट रसिकांना अमोल पालेकरच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील घौडदौडीचे विशेष कौतुक होते. त्यातही त्याने काही दर्जेदार चित्रपटात भूमिका साकारल्याने तो लाडका नायक झाला.
असाच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गोलमाल’ (रिलीज 20 एप्रिल 1979) च्या प्रदर्शनास तब्बल 45 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत ‘ड्रीमलॅन्ड’ थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले.
या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर (उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत, मार्मिक, मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.
एन. सी. सिप्पी निर्मित या चित्रपटाची कथा शैलेश डे यांची तर पटकथा सचिन भौमिक, तर संवाद डाॅ. राही मासूम रझा यांचे आहेत. छायाचित्रण जयवंत पाठारे यांचे आहे. या चित्रपटात बिंदीया गोस्वामी, डेव्हिड, देवेन वर्मा, दीना पाठक, अंजन श्रीवास्तव, शुभा खोटे, युनुस परवेझ, केश्तो मुखर्जी, मंजू सिंग, ओम प्रकाश इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.
तसेच अमिताभ बच्चन, रेखा, हेमा मालिनी, झीनत अमान इत्यादींच्या पाहुणे कलाकार म्हणून भूमिका आहेत. या चित्रपटाला राहुल देव बर्मनचे संगीत आहे. आनेवाला पल जानेवाला है…यासह या चित्रपटातील सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. स्वच्छ चित्रपटाच्या चाहत्यांना हा चित्रपट मस्त मनोरंजन आहे.
शब्दांकन : संजीव वेलणकर