टीम AM : यंदाचा उन्हाळा तीव्र असून एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. मे हा महिना तर अधिकच तीव्रतेचा महिना असल्याने या उन्हाळ्याला सामोरे कसे जायचे ? हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. तथापि उन्हाळा अधिक असला तर पावसाचेही प्रमाण अधिक राहते, त्यामुळे यंदा मार्च महिना प्रारंभ झाला की, उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी होती. साधारणताः गुढीपाडवा झाला की, खरी उन्हाची चाहूल लागावयास सुरुवात होते. रामनवमीनंतर ऊन वाढतच जाते. सध्याची वस्तूस्थिती ही तशीच असून उन्हाची परिस्थिती दिसून येत आहे.
उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून नागरिक थंड पेयाकडे वळत आहेत. परिणामी ऊसाचा रस, आईस्क्रिम, स्प्राईट, थम्सअप यासह अन्य थंड पेयांची मागणी वरचेवर वाढत आहे. सकाळी साधारणतः नऊ वाजल्यापासून प्रारंभ होणारे ऊन सायंकाळी सहापर्यंत तीव्र असते. ही तीव्रता लक्षात घेता दुपारी शहरातील वर्दळ कमी असून रस्त्यावर सामसूम दिसून येत आहे. ठिकठिकाणच्या झाडाखाली नागरिक उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी विसावा घेत आहेत.
पाण्याच्या थंड जारची मागणी वाढली आहे. गमजे, टोप्या यांचीही विक्री जोरात असून ठिकठिकाणी सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, मंडळे यांनी पाणपोई उघडल्या आहेत. गरीबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना बाजारात वाढती मागणी आहे. शंभर ते दीडशे रुपयांना असलेला माठ यावर्षी दोनशे ते अडीचशे रुपयांने विकल्या जात आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतरच या अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून सुटका होणार आहे.