पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला आग : पाच जवान शहीद

टीम AM : जम्मू – काश्मीरमधील पूंछमध्ये लष्कराच्या एका वाहनाला लागलेल्या आगीत 5 जवान शहीद झाले आहेत. भाटा धुरियन भागातील हायवेवर ही घटना घडली. हा अपघात असल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.

या दुर्घटनेबद्दल लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज कोसळून गाडीनं पेट घेतला आणि हा अपघात झाला. जवानांना काही कळण्याच्या आतच वाहन आगीत भस्मसात झाले. त्यात पाच जवानांना वीरमरण आल्याचं सांगितलं जातं.

पूंछ जिल्ह्यापासून 90 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. त्यावेळी पाऊसही सुरू होता. आगीची माहिती मिळताच स्थानिक लोक तिथं धावले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. बॉम्बस्फोट किंवा ग्रेनेड हल्ल्याची देखील शंका व्यक्त होत आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.