धारुर तालुक्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

टीम AM : धारुर तालुक्यातील रेपेवाडी येथील एका शेतकऱ्याने शेतातच लिंबाच्या झाडाला तर आंबेवडगाव येथे तरुणाने कुक्कुटपालन शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या दोन्ही घटनांनी धारुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शंकर प्रभाकर शेंडगे (वय 52 वर्ष) रा. रेपेवाडी ता. धारुर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना पाच एकर कोरडवाहू शेती आहे. शंकर यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुसरी घटना आंबेवडगाव येथे घडली आहे. सुखदेव नायकवाडे (वय 25 वर्ष) रा. आंबेवडगाव ता. धारुर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बऱ्याच दिवसांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा विचार करत होता. त्याने कुक्कुटपालन करण्यासाठी शेड उभारले, कोंबडीच्या पिल्लांची ऑर्डर दिली. परंतू पिल्लं येण्याआधी सुखदेव यांनी टोकाचं पाऊल उचलत कुक्कुटपालन शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही तासांतच धारुर तालुक्यात दोघांनी आपलं आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.