पहिलाच सिनेमा फ्लॉप, तीन वर्ष झेलली बेरोजगारी : पत्नीच्या पगारावर चालायचं अभिनेत्याचं घर

टीम AM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरशद वारसी यानं मुन्नाभाई सिनेमात सर्किट ही भूमिका साकारली होती. आजही त्याची ही भूमिका चाहत्यांच्या मनात आहे. अभिनेता अरशद वारसी याचा आज वाढदिवस.

अरशदचा जन्म मुंबईत 19 एप्रिल 1968 मध्ये झाला. आज अरशदनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं स्था निर्माण करत लोकप्रियता मिळवली आहे. परंतु एक काळ असा होता की, त्यावेळी अरशदनं प्रचंड संघर्ष केला होता. त्याचा पहिला सिनेमा अपयशी ठरल्यानंतर तो तीन वर्षे बेरोजगार होता. परंतु त्यानंतर त्यानं हार न मानता प्रयत्न करणं सोडलं नाही. प्रयत्न आणि चिकाटी यामुळे तो आज यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. 

पहिलाच सिनेमा अपयशी

अरशद वारसी यानं अभिनयाच्या विश्वात 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेरे मेरे सपने सिनेमानं एन्ट्री केली. हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या ‘एबीसीएल’ या निर्मिती संस्थेनं बनवला होता. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. हा सिनेमा अपयशी ठरल्यानंतर अरशदला प्रचंड संघर्ष करावा लागला होता.

पत्नीनं दिली खंबीर साथ

पहिलाच सिनेमा अपयशी ठरल्यानंतर अरशदकडे काहीही काम नव्हतं. त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की, कामासाठी त्याला वणवण फिरावं लागलं होतं. या कठीण काळात अरशदची बायको मारिया गोरेटी हिनं त्याला भक्कम साथ दिली. मारियानं दिलेल्या साथीबद्दल त्यानं एका सिनेमाच्या प्रमोशनवेळी सांगितलं होतं. तो म्हणाला की, ‘ ते दिवस माझ्यासाठी खूपच खडतर होते. त्यावेळी मारिया नोकरी करत होती. तिच्या पगारावरच घरखर्च चालत होता.’

तब्बल तीन वर्षे संघर्ष केल्यानंतर अरशदला हळूहळू यश मिळत गेलं. त्यानं अनेक सिनेमांत काम केलं. परंतु त्याला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमानं. या सिनेमात अरशदनं सर्किट ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आजही ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात संजय दत्त याची प्रमुख भूमिका होती.

या सिनेमानंतर अरशदला काम मिळत गेलं. त्यानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं. दमदार अभिनयानं तो लोकप्रिय झाला. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ शिवाय गोलमाल सीरिज, ‘धमाल’, ‘जॉली एलएलबी’, ‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’, ‘बच्चन पांडे’ या सिनेमात त्यानं काम केलं.