टीम AM : गेल्या वर्षीपासून मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले. गेल्या वर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला.
दरम्यान विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 81 व्या स्मृतिदिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंब गेल्या 33 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. दरम्यान मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.
यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा 24 एप्रिल 2023 रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन या ठिकाणी असणाऱ्या श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 24 एप्रिल रोजी मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल.