चार वाहनांचा भीषण अपघात : पिता – पुत्राचा मृत्यू

टीम AM : छत्रपती संभाजीनगरमध्ये चार वाहनं एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पिता – पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील नक्षलवाडी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन हायवा, एक मोटारसायकल आणि कार अशा चार वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला.

या अपघातात सासरवाडीला जात असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सासरवाडीला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील दोन सदस्य या अपघातात ठार झाले. या अपघातात पैठण येथील शिक्षक संजय सुखदेव दहिफळे आणि त्यांचा 13 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी कौशल्या दहिफळे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. 

चार वाहनांमध्ये झालेल्या या विचित्र अपघातात मोटार सायकल दोन वाहनांच्यामध्ये आली होती. या विचित्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी कौशल्या दहिफळे यांना  उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दहिफळे हे दांपत्य सासरवाडीला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.