राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती

टीम AM : राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली.

दिपक केसरकर म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे ‘आजी आजोबा दिवस’ साजरा केला जाणार आहे, अशी दिपक केसरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार आहे. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे, असंही केसरकर यांनी सांगितले.