नगरपरिषद : कार्यालय अधिक्षकाला दोन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

टीम AM : नगरपरिषदेत वडिलोपार्जित घराची नोंद करण्यासाठी, पीटीआरवर नोंदणी घेण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेतील कार्यालयीन अधीक्षकाने लाचेची मागणी केली. दोन हजाराची लाच स्विकारताना बीड एसीबीच्या टिमने मंगळवार, दि. 18 एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आत्माराम जीवनराव चव्हाण (रा. अंबाजोगार्ई) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण हे अंबाजोगाई नगर पालिकेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या व वडिलांचे नावे असलेले वडिलोपार्जित घराची मालकी हक्क वडिलांनी सोडून दिल्यामुळे तक्रारदार यांनी मालकी हक्कात वडिलांचे नाव कमी करुन स्वत: चे नावे नोंदणीचा फेर पीटीआरवर घेण्यासाठी कायदेशीर शुल्क म्हणून तीन हजार रुपये आणि लाच म्हणून स्वत: साठी तीन हजार अशी सहा हजार रुपयांची मागणी केली. 

तडजोडअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तीन हजार रुपये शुल्क भरायला लावल्यानंतर लाच रक्‍कम दोन हजार स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई न. प. कार्यालयातील कक्षात करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे यांनी केली.