राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चेला अजित पवार यांच्याकडून पूर्णविराम : बातम्या तथ्यहीन असल्याचा निर्वाळा

टीम AM : राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चेला अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं, अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आपण एक परिवार म्हणूनच काम करत राहणार असून, माध्यमांनी या चर्चा थांबवण्याचं आवाहन पवार यांनी केलं. 

अजित पवार म्हणाले की, या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. तुम्हीच अंदाज व्यक्त करताय. कोण अंदाज व्यक्त करतंय मला माहित नाही. माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, आता या गोष्टीला पूर्णपणे थांबवा. यामध्ये कारण नसतांना गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही चाळीस, पन्नास, साठ अशा सह्या झालेल्या नाहीत. सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय. उद्याच्याला पण परिवार म्हणूनच काम करत राहणार आहोत. 

माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक : शरद पवार

अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपण या चर्चांना आजिबात महत्त्व देत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पक्ष शक्तिशाली करण्याच्या विचारांशिवाय दुसरा कुठलाही विचार पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाही, असं ते म्हणाले. देशपातळीवर होणार असलेल्या विरोधकांच्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यात सहभागी होतील असा विश्वास आहे, असं पवार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.