बुट्टेनाथ घाटात पुन्हा अपघात : एसटी बस पलटी, 49 प्रवासी जखमी

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : अरुंद रस्ता ठरतोय धोकादायक

अंबाजोगाई : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुट्टेनाथ घाटात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी घाटातच एसटी बस पलटी झाली, या अपघातात जवळपास 49 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाईहून – मोरफळी या गावी जाणारी एसटी बस बुट्टेनाथ घाटात आली असता अचानक पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली. या बसमधून जवळपास 50 ते 60 प्रवासी प्रवास करीत होते. त्यामध्ये बरेच जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. बुट्टेनाथ घाटातील रस्ता अरुंद असल्याकारणाने या भागात अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आजचा अपघातही अरुंद रस्त्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच नायब तहसीलदार गणेश सरोदे, अधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्यासह तहसील, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले आणि जखमींना ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठवून दिले. 

मागील काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला होता. यामध्ये लहान मुलाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करण्यात आली होती आणि आजही या भागातील ग्रामस्थांनी ही मागणी लावून धरली आहे. परंतू त्या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

बस दरीत कोसळली असती तर ?

दरम्यान, बुट्टेनाथ घाटातील रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष आणि अरुंद रस्ता हा सामान्य माणसांसाठी जीवघेणा ठरत आहे. आज जर बस बाजूला असलेल्या दरीत कोसळली असती तर ? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करित आहेत. लोकप्रतिनिधींनी आतातरी ‘या’ रस्त्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.