टीम AM : माध्यमिक शाळेतील पदवीधर डी. एड. शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. डी. एड. शिक्षकांना पदवी प्राप्त तारखेस ‘क’ प्रवर्गात समावेश करण्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे.
यामुळे महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघ, पदवीधर डी. एड. कला क्रीडा शिक्षक संघ तसेच इतर संघटनांच्या लढ्याला यश आले आहे.
खासगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसंदर्भात महाराष्ट्र खासगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 12 अनुसूची ‘फ’ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ज्येष्ठता प्रवर्गनिहाय दिली होती. तथापि, पदवीधर डी. एड. शिक्षकांच्या ‘क’ प्रवर्गातील समावेशाबाबत संभ्रमावस्था निर्माण करून काही संस्था पदवीधर डी. एड. शिक्षकांना पदोन्नतीसाठी डावलत होत्या.
बारावीच्या वर्गांना शिकवतात. परंतु, सेवानिवृत्त होऊन देखील ते मुख्याध्यापक पदापासून वंचित होते. याबाबत पदवीधर डी. एड. शिक्षक संघटनांनी आवाज उठविला. शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी प्रवर्ग ‘क’ च्या दुरुस्तीबाबत 8 जून 2020 ला अधिसूचना काढली होती. त्यावर सूचना व हरकती मागविल्या. परंतु, अडीच वर्षे उलटूनही त्यावर अंतिम निर्णय होत नव्हता. त्यामुळे शिक्षक संघटनांनी सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली.
शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेत सरकारने 25 मार्चला याबाबतचा अध्यादेश काढला. त्यात माध्यमिक शाळेतील डी. एड. शिक्षक पदवी प्राप्त तारखेपासून ‘क’ प्रवर्गात समाविष्ट होतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे पदवीधर डी. एड. शिक्षकांना ‘क’ प्रवर्गात निश्चित स्थान मिळाले आहे. तसेच मुख्याध्यापकपदावरील पदोन्नतीचा मार्गसुद्धा मोकळा झाला आहे.