टीम AM : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आंध्रप्रदेशनंतर आता महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या विस्तारासाठी जोरदार प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर मुख्यमंत्री केसीआर आता छत्रपती संभाजीनगर येथेही जाहीर सभा घेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेतकरी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळं जोरदार राजकीय चर्चा रंगलेली आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभांचं नियोजन करत मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. येत्या 24 एप्रिलला मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे संभाजीनगरमध्ये येणार असून यावेळी ते जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना आणि शेतकरी नेते कैलास पवार यांनी नुकतंच हैदराबादमध्ये केसीआर यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता या नेत्यांनी पक्षवाढीसाठी मराठवाड्यात चांगलाच जोर लावल्याचं दिसून येत आहे.