टीम AM : राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसात वाया गेली आहेत.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्याप्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं फळबागांसह अन्य रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांसह हरभरा, गहू, ज्वारी, कांदा, भाजीपाला या पिकांनाही मोठा फटका बसला होता. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीन मदत द्यावी अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार मार्चमधील नुकसानीसाठी सरकारनं 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरीत केला आहे. दरम्यान, या महिन्यातही (एप्रिल 2023) अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. यामुळं शेतरी पिकांना मोठा फटका बसला आहे.
19 मार्चपर्यंत झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी मदत वितरीत
चार ते आठ मार्च आणि 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून मदत वितरीत करण्यात आली आहे.
महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी
अमरावती विभाग 24 कोटी 57 लाख 95 हजार
नाशिक विभाग 63 कोटी 9 लाख 77हजार
पुणे विभाग 5 कोटी 37 लाख 70 हजार
छत्रपती संभाजी नगर 84 कोटी 75 लाख 19 हजार
एकूण निधी 177 कोटी 80 लाख 61 हजार