‘स्वाराती’ च्या लिपीकास 37 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयातील लिपीक 37 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेेेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

या बाबतची अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणारा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत विमागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. 

तक्रारदाराच्या मयत सासरे यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तक्रारदार यांच्या पत्नीचा नोकरीत नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सादर करुन नियुक्ती ऑर्डर काढून देण्यासाठी नाईकवाडेंनी स्वतः पंच साक्षीदार समक्ष 80 हजार रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती 37000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेट समोरील आशियाना हॉटेलमध्ये पंचासमक्ष लाच रक्‍कम स्वीकारली असता रकमेसह नाईकवाडे यास अधिकाऱ्यांनी  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी केली. सोबत पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे हे उपस्थित होते.