सोनपेठच्या राजीव गांधी महाविद्यालयास विजेतेपद
अंबाजोगाई : योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित प्राचार्य स्व.बी.के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत परभणीच्या राजीव गांधी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रशांत शिंगाडे याने प्रथम, बीडच्या बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी ओम जाधव याने दुसरा क्रमांक, नांदेडच्या आर.जी. कॉलेजचा विद्यार्थी कृष्णा तिडके याने तृतीय तर नांदेड, औरंगाबाद, लातूर आदी ठिकाणच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी वर्गांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. विजेत्यांना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, राज्य शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक तथा जेष्ठ पत्रकार नानासाहेब गाठाळ, युवा साहित्यिक अभिजित जोंधळे, प्राचार्य डॉ. रमेश सोनवळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे उदघाटन जळगांवच्या जैन इरिगेशन सिस्टीमचे समन्वयक, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विनोद रापतवार, संस्थाध्यक्ष डॉ. खुरसाळे यांच्या उपस्थितीत झाले. मनोगतात प्रा. गाठाळ म्हणाले की, स्व. प्राचार्य सबनीस यांनी शिक्षणाबरोबर समाज जागृतीचे काम केले. पारदर्शी कारभार, स्वच्छ प्रतिभा यामुळे सबनीस हे शिक्षण क्षेत्रात लोकप्रिय झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण होण्याच्या दृष्टीने सुरु झालेली वक्तृत्व स्पर्धा भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल असे सांगितले. जोंधळे यांनी स्पर्धेबाबतच्या तयारी, नियोजन संबधात संवाद साधला.
स्पर्धेसाठी प्रा. क्रांती मोरे, रामेश्वर माले, प्रा.जोगदंड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. संचालन प्रा. सविता बुरांडे, आभार प्रा.डी.एल.सोनवणे यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, स्व. सबनीस सर यांच्या कार्यकाळातील सहकारी, विद्यार्थी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.