घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी सकाळी १० वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

२९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. या महापुजेसाठी सचिव भगवानराव शिंदे, देवल कमिटीचे विश्वस्त अक्षय मुंदडा, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम कुलकर्णी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते.

यावेळी विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्‍या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विविध उपक्रमांची रेलचेल

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रविवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदि उपक्रम सुरू झाले आहेत. आज दुपारी अंबाजोगाई येथे सहयोग महिला भजनी मंडळ, सोमेश्वर महिला भजनी मंडळ, संकटमोचन महिला भजनी मंडळ, वीरशैव महिला भजनी मंडळ, सत्संग महिला भजनी मंडळ, बाल कलापथक भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. तर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. श्रीकिसन महाराज पवार यांचे किर्तन झाले. यावेळी त्यांना वादनासाठी श्रीनिवास जगताप, प्रविण सलगर, व्यंकट धायगुडे, दामु भालेकर, माणिक तळणीकर, दीपक अदाटे, मुकुंद पवार यांनी साथसंगत केली. या सर्व उपस्थितांचे कलावंतांचे स्वागत योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांनी केले.