ज्येष्ठ अभिनेते नवीन निश्चल यांचा स्मृतिदिन : पुण्याच्या ‘एफटीआयआय’ मधून मिळवले होते सुवर्णपदक

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नवीन निश्चल यांचा आज स्मृतिदिन. नवीन निश्चल यांचा जन्म 18 मार्च 1946 साली झाला. पुण्याच्या ‘एफटीआयआय’ मधून सुवर्णपदक मिळवून नवीन निश्चल ‘सावन भादो’ या 1970 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकले. 

नवीन निश्चल यांनी नंतर ‘संसार’, ‘परवाना’, ‘बुढ्ढा मिल गया’, ‘नादान’, ‘व्हिक्टोरिया नंबर 203’, ‘हँसते जख्म’, ‘धर्मा’, ‘छलिया’, ‘धुंद’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. दोन पंजाबी आणि सुमारे 80 – 90 चित्रपटांतून सुरुवातीला नायक किंवा सहनायक म्हणून आणि नंतरच्या काळात चरित्र नायकाच्या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. 

2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रेक के बाद’, त्यापूर्वी आलेल्या ‘राजू बन गया जंटलमन’ ‘खोसला का घोसला’, ‘बॉलीवूड कॉलिंग’, ‘आशिक बनाया आपने’, ‘रहना है तेरे दिल में’ यांसारख्या अलीकडच्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकरल्या. 

बासू भट्टाचार्य दिग्दर्शित 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘आस्था’ चित्रपटात अभिनेत्री रेखा सोबतची त्यांची प्रणयदृश्ये चांगलीच गाजली होती. नवीन निश्चल यांना मोठ्या पडद्यावर नायकाच्या फारशा भूमिका नंतरच्या काळात मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. 

जया बच्चन निर्मित ‘देख भाई देख’ या दूरदर्शनवरील कौटुंबिक विनोदी मालिकेत नवीन निश्चल यांनी बलराज दिवान ही भूमिका केली होती आणि ती चांगलीच गाजली. नवीन निश्चल यांचे निधन 19 मार्च 2011 रोजी झाले. नवीन निश्चल यांना आपल्या समूहाकडुन आदरांजली.

शब्दांकन : संजीव वेलणकर