अंबाजोगाईत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांचा ‘मुकमोर्चा’ : आधार माणुसकीचा पुढाकार

अंबाजोगाई : अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने रविवारी (दि.19) आधार माणुसकीच्या पुढाकाराने तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या कुटूंबाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा, अशा मागण्या महिलांच्या वतीने करण्यात आल्या. 

रविवारी दुपारी अडीच वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघाला. सावरकर चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयात पोचला. या ठिकाणी आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या मागण्या मांडल्या. त्यात या कुटूंबाला प्राधान्याने घरकुल द्यावे, अनेक कुटूंबाला स्वस्तधान्य (राशन) मिळत नाही, ते देण्याची सोय करावी, एकल पालक कुटुंबातील मुलांना बालसंगोपन योजनेचा सरसकट लाभ द्यावा, या कुटुंबातील मुलांना शासकीय वसतिगृहात प्राधान्याने प्रवेश द्यावा, महिलांना शेती व गृह उद्योगासाठी कर्जपुरवठा करावा, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वाढवावे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या. 

तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांना निवेदन देताना महिला

या मागण्यांचे निवेदन महिलांच्या हस्ते तहसीलदारांना दिले. यावेळी तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी तालुकास्तरावर व अधिकाराच्या कक्षेत असणाऱ्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. 

याप्रसंगी सुदर्शन रापतवार, प्रा. पंडीत कराड, रामकृष्ण पवार, वसंतराव मोरे, ॲड. सुधाकर सोनवणे, मनोहर कराड, आयोध्या गाठाळ, आशा हबीब, अनिता कांबळे, रेखा देशमुख, प्रभावती अवचर, ज्योती शिंदे, सुलभा सोळंके, अनंत निकते, ॲड. महादेव मुदगुलकर, गोवर्धन पवार, भगवंत पाळवदे, सुभाष बाहेती, जमील भाई, राहुल देशपांडे आदींची उपस्थिती होती.

महिलांना ब्लँकेट भेट

या मोर्चानंतर सर्व महिला अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना सामाजिक कार्यकर्ते मनोहर कराड व प्रा. डॉ. वर्षा मनोहर कराड यांच्यातर्फे मदत म्हणून ब्लँकेट भेट देण्यात आले.