घाटनांदूर – अंबाजोगाई – दौंड नवीन रेल्वे मार्ग करावा : खासदार पूनम महाजन 

रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली मागणी

अंबाजोगाई : देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली तरी अंबाजोगाईला अद्याप रेल्वे आली नाही. अंबाजोगाईची भुमिकन्या खासदार पूनम महाजन यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एका पत्राद्वारे घाटनांदूर – अंबाजोगाई – दौंड या नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. 

घाटनांदूर – अंबाजोगाई – दौंड या रेल्वे मार्गासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने अनेक निवेदने देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते भारत पसारकर यांनीही अनेक वेळा केंद्रीय मंत्रालयात पत्रव्यवहार केला. तत्कालीन खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे, जयसिंग गायकवाड यांनीही रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला होता. अंबाजोगाईचे नागरिक अनेक वर्षांपासून नवीन रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करीत आहेत. परंतू, अपुऱ्या प्रयत्नामुळे ते शक्य झाले नाही.

रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार जी. एस. सौंदळे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार पूनम महाजन यांना मुंबई येथे काही मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यामध्ये घाटनांदूर येथे सर्व रेल्वेंना थांबा द्यावा आणि घाटनांदूर – अंबाजोगाई – दौंड हा नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, या मागण्यांचा यात समावेश होता. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे नागरिकांनी पाठपुरावा केल्यास नवीन रेल्वे मार्ग उभारण्यास निश्चितच गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.