पैशांसाठी शशी कपूर यांना विकावी लागली होती स्वतःची कार ! वाचा ‘तो’ किस्सा…

टीम AM : आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये अमिट छाप सोडणारे अभिनेते शशी कपूर यांचा आज समृतीदिन आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीचे ‘चार्मिंग’ अभिनेते शशी कपूर जरी आज आपल्यात नसले, तरी त्यांनी केलेल्या दमदार चित्रपटांमुळे ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनात अजरामर ठरले आहेत. 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर हे चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून होते. परंतु, त्यांनी स्वतः संघर्ष केला आणि इंडस्ट्रीत स्वत:साठी एक स्थान निर्माण केले.

बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन मोठा पडदा गाजवणाऱ्या शशी कपूर यांना देखील आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. या कठीण काळात त्यांना पत्नी जेनिफर हिने साथ दिली होती. 60 च्या दशकात शशी कपूर यांचे चित्रपट हिट होत होते. पण, अचानक त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे शशी यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरने एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता.

या काळात अभिनेते शशी कपूर यांना काम मिळणे जवळपास बंद झाले होते. अशा परिस्थितीत शशी यांना आपली आवडती स्पोर्ट्स कार विकावी लागली होती. इतकंच नाही तर, त्यांची पत्नी जेनिफर यांनी पैशासाठी स्वतःच्या काही वस्तूही विकाव्या लागल्या होत्या. यानंतर नंदा यांनी शशी कपूर यांच्यासोबत ‘फूल खिले’ हा चित्रपट केला, जो सुपरहिट ठरला. अभिनयासोबतच शशी कपूर यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली.

अमिताभ बच्चन यांचा ‘अजूबा’ हा चित्रपट शशी कपूर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला होता. त्या काळात हा चित्रपट 8 कोटींमध्ये बनला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे शशी कपूर यांना 3.50 कोटींचे नुकसान झाले होते. 

या नुकसानीमुळे शशी यांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्याकाळी हा तोटा भरून काढण्यासाठी शशी यांना आपली काही मालमत्ता देखील विकावी लागली. तर, ‘उत्सव’ या चित्रपटाच्या वेळी देखील त्यांना तब्बल दीड कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. शशी कपूर यांचे 4 डिसेंबर 2017 रोजी निधन झाले. शशी कपूर यांना अभिवादन.