देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प : सर्वच संवर्गातील घटकाला दिलासा

मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘नदी जोड’ प्रकल्पाची घोषणा

मुंबई : आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास असा पंचामृत अर्थसंकल्प सादर केला.

फडणवीस यांनी नव्या सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे. या योजनेत शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या वार्षिक सहा हजार रुपये निधीत तेवढीच भर घालून दरवर्षी शेतकऱ्यांना 12 हजार रुपये निधी वाटप प्रस्तावित आहे. या योजनेचा राज्यात एक कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असून, सहा हजार 900 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वार्षिक एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल, यासाठी तीन हजार 312 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. गोपीनाथराव मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान दिलं जाईल. महाकृषी विकास योजनेची घोषणा फडणवीस यांनी केली. प्रधानमंत्री कुसुम योजनेत पुढील वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप लावण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा नदी जोड प्रकल्पाची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. ते म्हणाले.. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर व कन्नड तालुक्यात जायकवाडी धरणातून बीड व लातूर जिल्ह्याकरीता जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून, धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून प्रथम, द्वितीय, तृतीय वॉटरग्रीड निर्माण करण्याची कारवाई सुरु आहे. ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटरग्रीडचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या मान्यतेकरीता पाठवण्यात आला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 2023 – 24 मध्ये 17 लाख 72 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे प्रस्तावित असून सुमारे 20 हजार कोटी रुपये या करीता प्रस्तावित आहेत. 

महिलांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. सर्व महिलांना एसटी प्रवास भाड्यात सरसकट 50 टक्के सवलत मिळणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता चौथीत चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय अठरा पूर्ण झाल्यानंतर तीला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. 

महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत नवीन दोनशे रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात सातशे हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जातील, यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा तसंच उपचार मिळणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

लिंगायत समाजासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारोती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. 

असंघटीत कामगार कल्याण मंडळ तसंच ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. 

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार करून सिंदखेडराजा ते शेगाव चौपदरी महामार्ग तसंच नागपूर – गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग या 760 किलोमीटरच्या महामार्गाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. 

सोलापूर – तुळजापूर – धाराशिव रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा 452 कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नांदेड – बीदर, फलटण – पंढरपूर, खामगाव – जालना, आणि वरोरा – चिमूर, या चार रेल्वे प्रकल्पांसाठी पन्नास टक्के राज्य हिस्सा देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं क्रीडा विद्यापीठाची घोषणा करण्यात आली असून, यासाठी 50 कोटी रुपये तर छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळ भूसंपादनासाठी 734 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडीत नाथसागर जलाशयावर तरंगता सौरउर्जाप्रकल्प उभारण्यात येणार असून, पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूरच्या फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास केला जाईल. 

बीड जिल्ह्यात गहिनीनाथ गड विकासासाठी 25 कोटी रुपये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, शुलीभंजन विकास आराखड्यास पुरेसा निधी देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी उपलब्ध होर्ईल, असंही या अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे. 

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उर्वरित 741 कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी 351 कोटी, पुण्यात भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 50 कोटी, वाटेगाव इथं अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटी रुपये तरतूद जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी, नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड इथं स्मारकासाठी पुरेसा निधी दिला जाईल,असं सांगितलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतल्या आठवीपर्यंतच्या सर्व प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, पाचवी ते सातवीची शिष्यवृत्ती आता वार्षिक पाच हजार रुपये तर आठवी ते दहावीची शिष्यवृत्ती वार्षिक साडेसात हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीची रक्कम 25 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

सर्व पाचही ज्योतिर्लिंग विकासासाठी 300 कोटी रुपये, पोहरादेवी संत सेवालाल महाराज स्मारकासाठी 500 कोटी रुपये तर महानुभाव पंथीयांच्या सर्व देवस्थान विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. आगामी आर्थिक वर्षात चार लाख 49 हजार 522 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित असून, चार लाख 65 हजार 645 कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. एकंदरीत 16 हजार 122 कोटी रुपये तूट असलेला अर्थसंकल्प फडणवीस यांनी सादर केला.