‘लेक लाडकी’ योजनेतून प्रत्येक मुलीला मिळणार लाखो रुपये, फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यात मुलींचा जन्मदर सुधारावा, या करिता ‘लेक लाडकी योजना’ सुरु करण्यात आली होती. या योजनेचं स्वरुप आता अंशतः बदलण्यात आलं आहे. या नव्या योजनेमुळे मुलींना आणि तिच्या पालकांना आर्थिक फायदा होणार आहे.

या योजनेनुसार, पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार आहे. मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये मिळतील. तर, मुलगी पहिलीला गेल्यावर तिला चार हजार रुपये दिले जातील. तर सहावीत सहा हजार , अकरावीत 8 हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. एवढंच नव्हे तर मुलीची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला 75 हजार रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे मुलींचा जन्मदर सुधारण्यास मदत होऊ शकेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये. त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत करण्यात आले आहे. राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुुरू करण्यात  येणार आहेत

निर्धारित योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य

संजय गांधी निराधार / श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये करण्यात आले आहे. यात राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार करण्यात येईल. त्यासोबतच वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून सरकार देणार आहे. 

विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर  मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देण्यात येणार आहे. 

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून  देेेण्यात येेेणार आहे. 

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला – मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.