छुपाना भी नहीं आता… अभिनेते सिध्दार्थ यांचा आज जन्मदिवस, जाणून घ्या जीवनप्रवास 

टीम AM : 90 च्या दशकात ‘बाजीगर’, ‘वंश’ सारख्या चित्रपटात काम करणारा सिद्धार्थ रे कदाचित फार कमी लोकांच्या लक्षात असेल. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण ते आजही सिनेरसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांची अभिनय शैली अशी होती की, त्या काळात ते खूप लोकप्रिय झाले होते. 

सिद्धार्थ रे यांनी 1992 मध्ये ‘वंश’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ‘बाजीगर’ चित्रपटात काजोलच्या मित्र इन्स्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका केली होती. ‘छुपाना भी नहीं आता..’ हे गाणं त्यांच्यावर चित्रित झालं होतं आणि हे गाणं तुफान गाजलं होत. सिद्धार्थ रे हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचे नातू होते. 1977 मध्ये ‘चानी’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसले आणि 1980 मध्येही त्यांनी ‘छोटी सी बेवफाई’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केली. 

‘बाजीगर’ आणि ‘वंश’ व्यतिरिक्त, ते ‘पनाह’, ‘बिछू’, ‘जानी दुश्मन’, ‘एक अनोखी कहानी’, ‘परवाने’, ‘युद्धपथ’ आणि ‘लष्करी राज’ या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सिद्धार्थ रे यांचा शेवटचा चित्रपट होता ‘चरस – अ जॉइंट ऑपरेशन 2004’. त्यांनी हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आणि 1992 ते 2004 या काळात ते चित्रपट क्षेत्रात सक्रिय होते.

सिद्धार्थने 1999 मध्ये अभिनेत्री शांतीप्रिया सोबत लग्न केले. दोघांमध्ये बरेच दिवस अफेअर सुरू होते. 1991 मध्ये शांतीप्रियाने अक्षय कुमारच्या ‘सौगंध’ या पहिल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय आणि शांतीप्रियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. यानंतर शांतीप्रियाने ‘मेहेरबान’, ‘फूल और अंगार’, ‘मेरे साजन साथ निभाना’, ‘वीरता’ आणि ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटांमध्ये काम केले.

सिद्धार्थ रे यांचे 2004 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, जेव्हा त्यांची दोन्ही मुले खूप लहान होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शांतीप्रियाच्या समोर अनेक आव्हाने आली होती, तिला काम मिळत नव्हते. छोट्या भूमिका आणि मालिकां मध्ये त्यांना काम करायला भाग पाडले. शांतीप्रिया ‘माता की चौकी’ आणि ‘द्वारकाधीश’ या दोन टीव्ही शोमध्ये दिसली. ती लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रियाची धाकटी बहीण आहे. सिध्दार्थ रे यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांना अभिवादन.