टीम AM : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा आज 13 एप्रिल रोजी जन्मदिन आहे. सतीश कौशिक यांनी जवळपास तीन दशके बॉलिवूडवर राज्य केले. या काळात त्यांनी पूर्ण निष्ठेने काम केले. सतीश कौशिक यांचे सुरुवातीचे आयुष्य आणि अभिनेता ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास जाणून घेऊयात.
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. त्यांनी आपले प्रारंभिक शालेय शिक्षण हार्कोर्ट बटलर स्कूल, मंदिर मार्ग, दिल्ली येथे केले, त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोड़ीमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
चित्रपटात जाण्याच्या इच्छेने त्यांना एनएसडी (NSD) म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नेले. तेथून 1978 मध्ये ते फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये गेले, शिक्षण पूर्ण करून सतीश कौशिक मुंबईत आले आणि त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सतीश कौशिक आणि अनुपम खेर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये बॅचमेट होते.
काम न मिळाल्याने कापड कारखान्यात केली नोकरी
सतीश कौशिक नेहमी वडिलांना सांगत होते की, आपले नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावे. अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतीश कौशिक मुंबईला गेले, पण सतीश कौशिक यांना मुंबईत काम मिळाले नाही. त्यानंतर ते एका कापड कारखान्यात काम करू लागले. यासोबतच, ते नादिरा बब्बरच्या थिएटर ग्रुपमध्येही सामील झाले. नंतर सतीश कौशिक दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम करु लागले. या दरम्यान त्यांनी कुंदन शाह यांच्या ‘जाने भी दो यारों के’ या चित्रपटाचे संवादही लिहिले.
दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट झाला फ्लॉप
सतीश कौशिक यांनी शेखर कपूरच्या ‘मासूम’ या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर, त्यांनी अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘रूप की रानी चोरों के राजा’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.
या चित्रपटाने फारसे यश मिळवले नाही. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले, अभिनेत्री तब्बूचा हा पहिला चित्रपट होता. पण दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिले यश अनिल कपूर आणि ऐश्वर्याच्या ‘हम आपके दिल में रहते हैं’ या चित्रपटाने मिळाले, जे त्या काळातील सर्वात हिट ठरले. याशिवाय अभिनेता म्हणून त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट 1987 मधला ‘मिस्टर इंडिया’ होता.
मुलाचे वयाच्या दुसऱ्या वर्षी झाले निधन
सतीश कौशिक यांनी 1985 मध्ये शशी कौशिक यांच्याशी लग्न केले. पण 1996 मध्ये लग्नानंतर त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूमुळे सतीश यांना खूप दु:ख झाले, नंतर त्यांनी कसेतरी स्वतःला सांभाळले. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनंतर 2012 मध्ये सरोगेट मदरच्या माध्यमातून मुलगी वंशिकाचा जन्म झाला. त्यावेळी सतीश 56 वर्षांचे होते.
गोविंदा – सतीश यांची जोडी होती नंबर 1
‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे सतीश कौशिक यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अनिल कूपर आणि श्रीदेवी यांनी काम केले होते. यानंतर सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘तेरे नाम’, ‘शादी से पहले’ आणि ‘कागज’ ‘प्रेम’ यासह अनेक शानदार चित्रपट दिग्दर्शित केले.
सतीश कौशिक हे उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच एक उत्तम विनोदी कलाकारही होते. त्यांनी गोविंदा सोबत अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका केल्या, ज्यासाठी ते खूप चर्चेत राहिले, सतिश कौशिक यांना दोनदा बेस्ट कॉमिडीयनसाठी ‘फिल्मफेअर’ अवार्ड मिळाला आहे. सतीश कौशिक यांचं 9 मार्च 2023 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, त्यांना अभिवादन.