नवजीवन नशामुक्ती केंद्रात होतयं रुगणांचं, नातेवाईकांचं शोषण : डॉ. संध्या वाघमारे

अंजली पाटील, राजकुमार गवळे यांच्यावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : वाघाळा येथील नवजीवन नशामुक्ती केंद्रात रुग्णांबरोबर नातेवाईकांचंही शोषण केले जात आहे, तिथे एकही प्रशिक्षीत डॉक्टर, कर्मचारी नसून त्या ठिकाणी सगळा भोंगळ कारभार आहे, असा गंभीर आरोप त्या ठिकाणी काम केलेल्या डॉ. संध्या वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. संध्या वाघमारे यांच्या तक्रारीवरुन नवजीवन नशामुक्ती केंद्राच्या अंजली पाटील, राजकुमार गवळे यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवजीवन नशामुक्ती केंद्रातील भोंगळ कारभाराविरोधात आणि झालेल्या अन्यायाविरोधात डॉ. संध्या वाघमारे यांनी आज दिनांक 10 मार्च रोजी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवजीवन नशामुक्ती केंद्रातील कारभार आणि संचालिका अंजली पाटील, राजकुमार गवळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाडाच वाचला. डॉ. संध्या वाघमारे म्हणाल्या की, नवजीवन नशामुक्ती केंद्रात मी रेसिडेन्स मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाले, तिथला कारभार मी पाहिला. 

अंजली पाटील आणि राजकुमार गवळे हे नवजीवन नशामुक्ती केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वेठीस धरुन त्यांच्याकडून भरमसाठ पैशांची वसूली करित आहेत, तिथे कुठल्याचं रुग्णांवर उपचार केले जात नाहीत, रुग्णांना योग्य ती औषधे दिली जात नाहीत. याची तक्रार मी त्यांना केली तर मलाच त्यांनी गप्प बसण्याची धमकी देत शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. मला माझ्या कामाचा पगारही दोघांनी दिला नाही, राजकुमार गवळेंची डिग्री सुध्दा बोगस आहे, असंही वाघमारे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत डॉ. संध्या वाघमारे यांनी अंजली पाटील आणि राजकुमार गवळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

मिडियाच्या माध्यमातून मला न्याय मिळवून द्यावा, असं भावनिक आवाहन डॉ. संध्या वाघमारे यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, शहराध्यक्ष गोविंद मस्के यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

अंजली पाटील, राजकुमार गवळे यांच्यावर गुन्हा दाखल

वाघाळा येथे असलेल्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील यांच्यासह राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरोधात अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कलमान्वये 9 मार्च रोजी रात्री उशिरा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. संध्या वाघमारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करित आहेत.