दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय देणार : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. आज सकाळी कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना, राऊत यांनी, विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असा उल्लेख केला. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी लाऊन धरली. विधीमंडळाच्या अवमानावर बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणाचा गांभीर्याने विचार व्हावा, तथ्य तपासून योग्य तो निर्णय विधीमंडळाने घ्यावा, असं मत व्यक्त केलं. नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाकडून अतुख भातखळकर तसंच भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दाखल केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊतांवर कारवाईच्या मागणीसाठी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं होतं.
बुधवारी निर्णय जाहीर करीन : अध्यक्ष राहुल नार्वेकर
याप्रकरणी दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, प्रस्तूत सूचनेअन्वये उपस्थित करण्यात आलेली बाब अत्यंत गंभीर असून सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कारवाईवर प्रतिकुल परिणाम करणारी तसेच विधीमंडळातील सन्माननीय सदस्यांचा, संपूर्ण सभागृहाचा व एकूणच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान ठरत असल्याचे माझे प्राथमिक मत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब प्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून बुधवार दिनांक आठ मार्च 2023 रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन.
विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण दरेकर यांनी कारवाईची मागणी केली. राऊत यांचं विधान हे विधीमंडळाचा अपमान करणारं असून सर्व सदस्यांनी याचा एकमताने निषेध करून असा अपमान खपवून घेणार नसल्याचा संदेश विधिमंडळानं देणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
अटकेसंदर्भातला अधिकार राज्य सरकारचा : डॉ. नीलम गोऱ्हे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य समर्थनीय नसल्याचं सांगत हे वक्तव्य त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी केलं हे तपासून पाहण्याची मागणी केली. मात्र विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करत असल्याचं सांगत, यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सांगितलं, मात्र संबंधितांना अटकेसंदर्भातला अधिकार राज्य सरकारचा आहे, त्यामुळे सदस्यांनी ती मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्याचा सल्ला उपसभापतींनी दिला.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, एकूण सगळ्यांच्या भावना पाहिल्या. मी यामध्ये माझा निर्णय दिलेला आहे की मी तपासून घेते आणि उद्या सकाळी मी हक्कभंगाच्या संदर्भामधला माझा निर्णय जाहीर करते. हे देखील स्पष्ट केलेलं आहे, की अटक करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्याकडे बघून जी मागणी करताय ती तुम्ही माननीय गृहमंत्र्यांच्याकडे मागणी करू शकता. तो माझा अधिकार घेणं स्वतःच्या हातामध्ये एखाद्या खासदाराला मला योग्य वाटत नाही. पण हक्कभंगाबद्दलचा निर्णय मी घेईन.