छत्रपती शिवरायांचा जयघोष : ढोल – ताशांच्या गजरात अंबाजोगाईत शिवजयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अंबाजोगाई शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून निघालेली भव्य मिरवणूक व मिरवणुकीतील पारंपारिक लोककला, पारंपारिक वाद्य, तलवारबाजी, काठ्यांचा खेळ या सर्व प्रकारांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. ध्वजारोहण व मानवंदना या कार्यक्रमास शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी अध्यक्षा शरयू हेबाळकर, पोलिस निरीक्षक विनोद घोळवे, मानवलोक संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की, मुस्लिम धर्मगुरू मारूक बाबा, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. राहूल धाकडे यांच्यासह सामाजिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिवशाहीर मामा काळे व शहरातील स्थानिक कलावंतांनी पोवाडयाचे सादरीकरण केले. 

शिवजन्मोत्सवाच्या या दिमाखदार सोहळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थीं- विद्यार्थिनी, महीला भगिंनीं, बालकांची, युवकांची लक्षवेधी उपस्थिती होती. शहरातील काणाकोपऱ्यातुन हजारो शिवभक्त शिवजयंतीत सहभागी झाले होते, या मिरवणुकीत जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी शहर दुमदुमले होते, शिवभक्तांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

मिरवणुकीचे मुख्य आकर्षण

घोडे, उंट, विविध ढोलपथक, हलगी पथक, शिवकालीन पारंपारिक दांडपट्टे पथक, वासुदेव, आराधी – गोंधळी, वारकरी, बालकांच्या वेशातील शिवबा जिजाऊ, शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.