तणावमुक्त विद्यार्थी – तणावमुक्त परीक्षा !

परीक्षेला सामोरे जाताना खास विद्यार्थी व पालकांसाठी ‘शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार प्राप्त सर नागेश जोंधळे’ यांचा विशेष लेख

टीम AM : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांची धडपड होत असते आणि त्यातच वेगवेगळ्या टप्प्यावर विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. करिअरच्या दिशेने वाटचाल करताना विद्यार्थी जीवनातील अतिशय निर्णायक ठरणारी असते ती दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा. खरं पाहिलं तर ही बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांची जरी असली, तरी पालक, शिक्षक, घरातील सर्व सदस्य यांचीही लगबग व विद्यार्थ्याकडे बारकाईने लक्ष असतं. अभ्यासाचे नियोजन, वेळेचा सदुपयोग, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव, आहार, झोप, व्यायाम, बाहेर फिरणे, मित्र – मैत्रिणीं सोबत गप्पा मारणे, टीव्ही पाहणे, सिनेमा, मोबाईल, इंटरनेट यावर न कळत असलेली बंधने या सर्वच गोष्टीं झालेल्या असताना आता आपण महत्वपूर्ण अशा टप्प्यात आलेलो आहोत तो म्हणजे परीक्षेचा कालावधी. 

आत्तापर्यंत घेतलेले परिश्रम याचे चीज करण्यासाठी तुम्हाला पुढील परीक्षा कालावधीतील प्रत्येक दिवसाचे, तासाचे, मिनिटांचे व पेपरचे अतिशय दिमाखदारपणे व कटाक्षाने काळजी घेण्यासाठी पुढील बाबींचा अवलंब केल्यास निश्चितपणे 50 ते 95 टक्के पर्यंत मजल मारण्यास मदत होणार आहे. आपल्याला बोर्डातील परीक्षेत चांगली टक्केवारी मिळाल्यामुळे आपणास  देशातील तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय येथे प्रवेशाबरोबर चांगली शाखा निवडण्यासाठी फायदा होणार आहे व आपल्या स्वप्नपूर्तीचा राजमार्ग आपणास भेटणार आहे. 

परीक्षेला जाण्यापूर्वी एक दिवस अगोदर

1. ज्या विषयाचा पेपर आहे त्याचे सर्व नोट्स, महत्त्वपूर्ण नोंदी, चाप्टर वाईज केलेला अभ्यास व त्यांचे बुलेट्स, हॉट क्वेश्चंस् लिस्ट याचे तीन ते चार टप्प्यात विभाजन करणे महत्त्वपूर्ण ठरेल. 

2. दर दोन – तीन तासानंतर 15 ते 30 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. या ब्रेकचा वापर तुम्ही चहा, दूध, ब्रेकफास्ट, ज्यूस, लिंबू शरबत अगदी सामान्य आहार किंवा पेय घेऊन स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी करता येईल. 

3. पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे करत तुम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे व प्रामाणिकपणे कृती करा. 

4. आपणास असलेल्या विविध विषयांचा अभ्यास करताना विशेषतः भाषा विषयांमधील व्याकरण, निबंध, लेखन कौशल्याचा सराव करून अधिक तयारी करा. 

5. गणित – भूमिती यांसारख्या विषयाची तयारी करताना घोकमपट्टी न करता त्यातील प्रमेय, सूत्र इत्यादींची रचना समजून घेतल्यास ते अधिक काळासाठी लक्षात राहील व परीक्षेत देखील आठवेल. 

6. विज्ञान विषयातील असणाऱ्या आकृती, त्यांची नावे, रासायनिक क्रिया आणि समीकरणे यांचा अधिक सराव करणे फायदेशीर असेल. 

7. प्रत्येक विषयाचा किमान एक तरी सराव पेपर ‘टाईमर’ लावून सोडवावा यामुळे निश्चितच तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. 

8. किमान पाच ते सहा तास झोप आवश्यक आहे.

9. आपले प्रवेशपत्र, ओळखपत्र, पट्टी, पेन – पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य व्यवस्थित एका ठिकाणी असल्याची खात्री करा. 

पेपरचा दिवस

1. सकाळी लवकर उठणे अधिक फायद्याचे. यामुळे आपण हलकासा व्यायाम, एकाग्रतेसाठी ध्यान करणे व मन प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. 

2. आजचा दिवस खूप सुंदर आहे व आपण अधिक यश संपादन करणार आहात असा स्वतःला विश्वास द्या. 

3. पेपरला जाण्यापूर्वी कमीत कमी एक ते दोन वेळा उजळणी करणे महत्त्वाचे आहे. 

4. परीक्षेत लागणारे सर्व साहित्य, यासोबतच घडी, हातरुमाल, पाण्याची बॉटल आदी घेतल्याची खात्री करूनच घरातून बाहेर पडा. 

5. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 30 मिनिटे अगोदर हजर राहणे महत्त्वाचे.

परीक्षा हॉलमध्ये

1. आपला परीक्षा हॉल क्रमांक व आसन क्रमांक याची खात्री करून आत प्रवेश करावा. 

2. आपल्या आसन क्रमांकावरच आपण स्थान ग्रहण करावे. 

3. आपल्या हॉलमधील नियोजित पर्यवेक्षक काही महत्त्वपूर्ण सूचना करतील, त्याचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असते.

उत्तर पत्रिका लिहितेवेळी घ्यावयाची काळजी

1. आपण वर्षभर केलेला अभ्यास आणि पुढील दोन ते तीन तासात एकाग्रचित्तेने लिहिलेला पेपर आपल्या यशात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणारा आहे.

2. उत्तर पत्रिका मिळताच आपण ती व्यवस्थित पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पाहणे व सर्व पाने सुस्थितीत असल्याचे खात्री करूनच आपला आसन क्रमांक, इतर महत्त्वपूर्ण माहिती व स्वाक्षरी करा. 

3. जर उत्तर पत्रिकेत एखादे पान किंवा पानावरील रेषा ह्या व्यवस्थित वाटत नसतील तर आपले पर्यवेक्षक किंवा शिक्षक यांच्याशी संपर्क करून ती त्वरित बदलून घ्यावी.

प्रश्नपत्रिका हाती आल्यावर

1. प्रश्नपत्रिका हाती आल्यावर सुरुवातीचे पाच मिनिट ज्या विषयाचा पेपर आहे त्याच्या नावाची, पेपर कोड, इत्यादी खात्री करून घेणे. 

2. पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या पानावरील प्रश्नापर्यंत शांतचित्ताने त्याचे वाचन करावे.

3. ज्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल आपण आत्मविश्वासाने लिहू शकतात असा प्राधान्यक्रम ठरवून लिहायला सुरुवात करावी. 

4. उत्तरे लिहीत असताना आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून उत्साहाने एक – एक प्रश्नांची उत्तरे अगदी स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरात लिहावे. 

5. एखादा प्रश्न अवघड वाटत असेल व त्याचे उत्तर लिहिताना खूप आठवावे लागत असेल तर अशावेळी त्याच ठिकाणी ताटकळत न बसता पुढील प्रश्न सोडवण्यास सुरुवात करावी. 

6. शेवटची 30 मिनिटे ही महत्वपूर्ण असल्यामुळे आपण आत्तापर्यंत सोडवलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तरे नीट व सुटसुटीत लिहिली असल्याची खात्री करून घेणे व एखादा प्रश्न सुटला असल्यास त्याचे उत्तर आठवून ते लिहिण्यास सुरुवात करणे महत्त्वाचे ठरेल. 

7. पेपर पर्यवेक्षकांना देण्यापूर्वी शेवटच्या पाच मिनिटात परत एकदा मुख्य पुरवणी त्यासोबतच आपण घेतलेली अधिक पुरवणी हे व्यवस्थित जोडली असून त्यावरील आसन क्रमांक, इतर महत्त्वपूर्ण माहिती व स्वाक्षरी याची परत एकदा खात्री करणे व मगच परीक्षकांच्या हातात पेपर सुपूर्द करणे.

पेपर झाल्यानंतर

1. परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर आपल्या मित्र – मैत्रिणी सोबत त्यांनी पेपर कसा लिहिला याची विचारपूस करतानाच काही गोंधळून टाकलेल्या प्रश्नांची उत्तरे याबाबत मनमोकळेपणाने चर्चा करावी. 

2. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन आपण उत्तर पत्रिकेत लिहिलेल्या प्रश्न – उत्तरांची खात्री करून घ्यावी. 

3. पुढील पेपरची तयारी सुरू करण्यापूर्वी अर्धा ते एक तास आराम करावा, त्यामुळे शरीरावरील व मनावरील आलेला ताण कमी होण्यास मदत होईल. 

4. झोपेतून उठल्यावर परत एकदा नवीन उत्साहाने व ऊर्जेने पुढील पेपरच्या तयारीला लागणे व हा क्रम शेवटच्या पेपरपर्यंत चालू ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

घरातील वातावरण व विद्यार्थी – पालक – शिक्षक यांच्यातील सुसंवादाचे महत्त्व

1. आपल्या पाल्याच्या परीक्षेसाठी सर्व घरातील सदस्यांची विशेष तयारी चालू असते. परीक्षा कालावधीत आपण त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेत असतो. सोबतच, विद्यार्थी हा अभ्यास व पेपरचे वेळापत्रक यांच्यामुळे ताण – तणावांमध्ये वावरत असताना घरातील वातावरणाचा त्याच्या अभ्यासावर व टक्केवारीवर नक्कीच परिणाम होणारा असतो.

2. परीक्षार्थी मुला – मुलींनी आपल्या आई – वडिलांशी, भाऊ – बहिणींशी अभ्यासाच्या टप्प्यातील ब्रेकमध्ये मन मोकळेपणाने बोलणे अधिक फायद्याचे व तनावरहीत राहण्याचे प्रभावी माध्यम आहे.

3. परीक्षा कालावधीत किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्या परीक्षार्थी मुला – मुलीला बाहेर घेऊन जाण्याचे टाळून त्याला अभ्यासाबद्दलची काही अडचण असल्यास आपल्या ओळखीच्या शिक्षक – शिक्षकेची मदत घेता येऊ शकेल व त्याचा आत्मविश्वास वाढवता येईल.

4. अधिकच ताण – तणाव किंवा चिडचिड होत असल्यास आपल्या जवळील तज्ज्ञ शैक्षणिक समुपदेशकांशी किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधून आपल्या पाल्यास पुन्हा नव्याने परीक्षेची लढाई जिंकण्यासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिकरित्या जोमाने तयारीला लागता येईल.

5. मित्र – मैत्रिणी सोबत अभ्यास करत असल्यास समूह चर्चेवरती भर देता येऊन आपल्याला त्या विषयातील बारकावे लक्षात घेऊन अधिक चांगली तयारी करता येईल. पण परीक्षेच्या विषयी चर्चा व्हावी, इतर वायफळ गोष्टी किंवा ज्यामुळे आपले लक्ष विचलित होईल, अशी चर्चासत्र नको.

सर्वात शेवटी लक्षात असू द्या, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आपला स्कोर किती आहे / होता ? याबद्दल नक्कीच चर्चा होत राहणार आहेत. त्यामुळे अगदी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जा व उत्तुंग असं यश मिळवा. या शुभेच्छा सह आपल्या सर्वांना चांगले आरोग्य, चांगले जीवन जगण्यासाठी तुमच्या तसेच आई – वडिलांची, शिक्षक – प्राध्यापक व प्रशिक्षकांची स्वप्नपूर्तीसाठी माझ्याकडून व ‘आई’ सेंटर परिवाराकडून मनःपूर्वक सदिच्छा.. विजयी भव ! 

– विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे

संचालक – ‘आई सेंटर’ हे शिक्षण क्षेत्रातील ‘आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार विजेते’ असून आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक तथा प्रशिक्षक, बहूविश्वविक्रमवीर व उत्कृष्ट करिअर समुपदेशक तथा यश तज्ज्ञ आहेत.

मो. न. 09404643944, 09975306156.