जेष्ठ संगीतकार राम कदम यांचा जन्मदिन : रसिकांनी दिली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली 

टीम AM : जेष्ठ संगीतकार राम कदम यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म. 28 ऑगस्ट 1916 रोजी झाला. मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले, त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. 

‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. असं म्हटलं जाते की, गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगीते करावी तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच ! 

मराठी लावणीचे लावण्यं खुलवून त्यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो.

‘पिंजरा‘ ही संधी संगीतकार राम कदम यांना मिळाली व त्या संधीचे राम कदम यांनी सोने केले. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात ‘पिंगा ग पोरी पिंगा…’ याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे. 

पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणतात. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1962 सालचा अनंत माने दिग्दर्शित ‘भाग्यलक्ष्मी’, 1975 सालचा व्ही. शांताराम प्रोडक्शनचा ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ आणि 1976 साली अनंत माने दिग्दर्शित ‘पाहुणी’ या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती. 

मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे. राम कदम यांचे 19 फेब्रुवारी 1997 रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून राम कदम यांना अभिवादन.

शब्दांकन : संजीव वेलणकर